मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वेगाने पसरत असल्याचं पुढे आले आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्रात १८८१ कोविड रुग्ण आढळले. त्याचसोबत पुण्यात एका रुग्णाला BA5 व्हेरिएंटची लागण झाल्याचं उघड झाल्याने खळबळ माजली आहे. एका महिलेमध्ये कोविडचा हा व्हेरिएंट आढळला आहे. कोविड रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ८ हजार ४३२ इतकी झाली आहे.
राज्यात मागील २४ तांसात ८७८ रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट ९८.०२ टक्के इतका आहे. तर कोविडमुळे मृतांची टक्केवारी १.८७ टक्के आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात बीए ५ व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. पुण्यातील महिलेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. बीजे मेडिकल कॉलेजनुसार, जीनोम सिक्वेसिंगच्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला. त्यात पुण्यातील ३१ वर्षीय महिलेला बीए ५ व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आले.
कोरोनाच्या मुळ विषाणुमध्ये उत्परिवर्तन होत असते. आपल्याकडे याआधी दुसरी लाट डेल्टा या विषाणुमुळे तर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे तिसरी लाट आली होती. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ हे विषाणुंचे प्रमाण अधिक होते. हे दोन्ही उपप्रकार आधी भारतात आढळून आले होते. मात्र, आता त्यामध्ये आणखी उत्परिवर्तन झाले असून त्यापासून बी ए. ४ आणि बीए. ५ त्यामध्ये हे दोन्ही विषाणुप्रकार तयार झाले असून ते अधिक संसर्गजन्य आहेत. या नव्या व्हेरिएंटमुळे दक्षिण अफ्रिकेत पाचवी लाट आली आहे.
राज्यानं कोरोना चाचणी वाढवल्याकाही ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट ५ ते ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या सर्व जिल्ह्यांमधील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के पॉझिटिव्ह येत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण या सहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात मास्कसक्तीचा निर्णय झालेला नाही. पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावे. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावेत. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिने झाले असतील तर बूस्टर डोस घ्यायला हवा, असंही टोपे म्हणाले.