मुंबई - राज्यावर आलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाने पुन्हा एकदा गंभीर रूप धारण केले आहे. मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्येत घट झाल्याने काहीसा दिलासा मिळत असतानाच काल आणि आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने मोठी उसळी घेतल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाच्या तब्बल ३ हजार ६०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात १५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन हजार ५९० झाली आहे.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीत बरे झालेल्या रुग्णांची संख्या हीच काय ती दिलासादायक बाब ठरत आहे. आज दिवसभरात १५६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा ४६ हजार ०७८ वर पोहोचला आहे. तर सध्याच्या घडीला राज्यामध्ये कोरोनाचे ४७ हजार ९६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, मुंबईतही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ हजार ८५ वर पोहोचला आहे. मुंबईत आतापर्यंत १९५४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत २४ हजार २०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या मुंबईत कोरोनाचे २७ हजार ९१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.