मुंबई : अत्यावश्यक सेवेसाठी एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश महाव्यवस्थापकाकडून देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास निलंबित करण्यात येणार आहे. मात्र तरीदेखील एसटीचे सुमारे ५० टक्के कर्मचारी गैरहजर राहिल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी चालक, वाहक, पर्यवेक्षीय व इतर कर्मचाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. मात्र, सुमारे 50 टक्के कर्मचारी कर्तव्यावर गैरहजर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्तव्यावर जात असलेल्या कर्मचाऱ्याचे बळ कमी होत आहे. लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाच्या 600 गाड्यांचे नियोजन केले आहे. तर त्याप्रमाणेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील एसटी डेपोच्या सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापकानी दिले आहेत. मात्र या आदेशाचे पालन कर्मचाऱ्याकडून केले जात नसल्याचे दिसून येत आहे. एकूण नियोजन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. त्यामुळे एसटीच्या अपुऱ्या फेऱ्या होत आहेत.
लॉकडाऊन असल्याने कामगारांना आगारात पोहोचण्यासाठी पर्यायी वाहतूक नाही. काही कामगार मुंबई महानगराबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई येण्यास सुविधा नाही. परिणामी आगारात पोहोचायचे कसे, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. मात्र काही कर्मचारी घरात बसून आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.