मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा वेग आजही कायम राहिला आहे. आज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा पाच हजाराच्या वर पोहोचला आहे. तर आज अजून 19 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांचा आकडा 251 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 722 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5218 झाली आहे. 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 722 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 4245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. तर 5218 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 99 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 7,808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील 12, पुण्यातील 3, ठाणे मनपामधील 2 तर सांगली येथील 1 आणि पिंपरी चिंचवड येथील 1 रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 10 पुरुष तर 9 महिला आहेत. त्यात 60 वर्षे किंवा त्यावरील 9 रुग्ण आहेत तर 9 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 1 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. या 19 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.