मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाच्या नवीन ९२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १६६६ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात शनिवारी सकाळी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये मुंबईत ७२ पुण्यात १, औरंगाबाद २, मालेगाव - ५, पनवेल -२, कल्याण-डोंबिवली १, ठाणे - ४, पालघर -१, नाशिक-२, अहमदनगर १ आणि वसई-विरारमध्ये एका रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी २१० रुग्णांची नोंद झाली होती. तर मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारने ओलंडला आहे. मुंबई काल २४ तासांत १३२ नवे रुग्ण सापडले होते, तर आज ७२ रुग्ण आढळले आहेत. धारावी परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काल रुग्णांचा आकडा २८ वर पोहोचला होता.
जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत १६ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही चार हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. ही सामुदायिक संसर्गाची शक्यता असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन वाढवून जिथे अधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे लोकांना अजिबात घराबाहेर पडू न देणे हाच मार्ग सरकारला दिसत आहे. त्याची राज्यांनी अधिक कडक अंमलबजावणी करावी, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे.