मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून गरजू नागरिकांना अन्नदान, जलदान सुरू आहे. 28 मार्चपासून मध्य रेल्वेच्या अन्न जीवन रेखाच्या माध्यमातून सुमारे 14 हजार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली आहेत.
मध्य रेल्वे २८ मार्चपासून मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर गरजू लोकांना अन्नाची पाकिटे, किराणाच्या वस्तू, बिस्किटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फळांचे दान करत आहेत. 28 मार्च रोजी 1 हजार, 29 मार्च रोजी 2 हजार 485, 30 मार्च रोजी 4 हजार 54, 31 मार्च रोजी 6 हजार 474 नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत.
आयआरसीटीसी, स्वयंसेवी संस्था, वाणिज्यिक कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी इत्यादींच्या सहकार्याने दररोज अन्नदान केले जाते. मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, भायखळा, परळ, लालबाग, हिंदमाता, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळकनगर, घाटकोपर, मुलुंड, भांडुप, दिवा, मुंब्रा, कल्याण, भिवंडी रोड, इगतपुरी आणि मदनपुरा भागात १ हजार ६८७ खाद्यपदार्थांचे पाकिटांचे गरजू व्यक्तींना वाटप करण्यात आले.
सोलापूर विभागात कलाबुरगी, सोलापूर स्टेशन परिसरामध्ये २२५ गरजू व्यक्तींना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले. पुणे विभागातील पुणे व कोल्हापूर स्टेशन परिसरामध्ये ८५० लोकांना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले. भुसावळ विभागात खंडवा, पाचोरा, नाशिकरोड, देवळाली व भुसावळ स्थानकातील सुमारे १ हजार ५६४ लोकांना खाद्यपदार्थांचे पाकिटे वाटण्यात आले. यात भुसावळ येथील राज्य सरकारच्या अधिकाय-यांना देण्यात आलेल्या १ हजार२०० खाद्यपदार्थांचे पाकिटांचा समावेश आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, बैतूल आणि हिंगणघाट स्थानकांतील परिसरातील २४८ लोकांना खाद्यपदार्थ पॅकेटचे वाटप करण्यात आले.