Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 10:40 AM2020-03-29T10:40:40+5:302020-03-29T10:43:22+5:30
९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते.
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. अशातच लोकांनी घरातच राहावं यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत या मालिका दाखवणं सुरुवात केली आहे.
लोकांनी केलेल्या मागणीचा आग्रहास्तव या मालिका पुन:प्रक्षेपण करण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पुन्हा या मालिका दाखवण्यात येत आहे. दूरदर्शनवर "रामायण" मालिका पुनर्प्रक्षेपित करण्याचा निर्णय झाला आणि महाराष्ट्रातून अनेकांनी मागणी केली की "स्वराज्यरक्षक संभाजी"मालिका पुन्हा प्रसारित करावी त्याप्रमाणे झी मराठी वाहिनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा दाखवण्याचं ठरवलं आहे.
याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, या मागणीनेच अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. आपल्या कलाकृतीची तुलना अप्रत्यक्षपणे आपण लहानपणी आदर्श मानलेल्या कलाकृतीशी होते ही बाब एक वेगळाच आनंद देऊन जाते.. त्यात अशाही काही पोस्ट पहिल्या की "लॉक डाऊन चा हेतू साध्य होण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची मदत होईल. प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केलेल्या गोष्टीचा असा प्रभाव पडत असेल तर कलाकाराला आणखी काय हवं? स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो असं त्यांनी सांगितले.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका झी मराठीवर ३० मार्चपासून संध्याकाळी ४ ते ८ यावेळेत दाखवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर ही मालिका साकारण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे त्यांचा इतिहास महाराष्ट्रातील घरोघरी पोहचला. अनेकदा ही मालिका दबावामुळे बंद पडत असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अनेक शिवप्रेमींनी ही मालिका सुरुच राहावी याची आग्रही मागणी केली होती. संभाजी महाराजांना झालेल्या अटकेमुळे रसिकांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच मालिकेच्या शेवटच्या दिवशी अनेक रसिकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं.