अहमदनगर/मुंबई : कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर करण्याची संधी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना गुरुवारी मिळाली. ऑक्सिजनच्या लढाईपासून ते हिवरेबाजारने केलेल्या प्रयत्नांपर्यंतची सर्व माहिती त्यांनी दिली. हाच पॅटर्न आता जिल्ह्यातील १,३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
मोदी यांनी गुरुवारी ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित राज्यांतील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यात वर्धा, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा, सातारा, सांगली, नाशिक, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा जिल्ह्याला फायदा झाला. प्रशासन थेट ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहोचले. ग्रामपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद करण्यात आला. रुग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता कोविड सेंटरमध्ये ठेवले गेले, अशा अनेक बाबी भोसले यांनी सांगितल्या.
देशपातळीवर प्रयोग करणार : मोदी
कोरोनामुक्तीसाठी गावांनी राबविलेल्या यशस्वी प्रयोगांची देशपातळीवर अंमलबजावणी केली जाईल. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुकव्हिडिओ कॉन्फरन्सनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालक सचिव आशिषकुमार सिंह आदींनी डॉ. भोसले यांचे तसेच पोपटराव पवार यांचे कौतुक केले.
मुंबईचेही कौतुक बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी उत्तम ऑक्सिजन व्यवस्थापन आणि कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले, असे ते म्हणाले.
हिवरेबाजारची यशकथाआदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांचे हिवरेबाजार गाव कोरोनामुक्त केले. जिल्हा प्रशासनाने त्यांचे अनुकरण करत त्यांचे अनुभव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इतर गावांतील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविले, ही माहितीही जिल्हाधिकारी भोसले यांनी पंतप्रधानांना दिली.