Coronavirus:…म्हणून अजित पवारांनी लिहिलं लष्कराला पत्र; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:05 PM2020-03-27T14:05:10+5:302020-03-27T14:08:32+5:30
तर कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत.
मुंबई – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशातच विनाकारण लोक घराबाहेर पडत असल्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं होतं. राज्यात लष्कराला पाचारण करायची वेळ आणू नका असं अजितदादांनी बजावलं होतं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लष्कराला पत्र लिहिल्याची बातमी आली.
याबाबत खुलासा करताना अजित पवार म्हणाले की, राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील असं अजितदादा म्हणाले.
तर कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
त्याचसोबत जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे अशी सूचना अजितदादांनी दिली.
दरम्यान, जीवनावश्यक वस्तू मिळत राहतील, असे सांगूनही लोकांनी खरेदीसाठी गर्दी करणे चिंताजनक आहे. तसेच प्रवासबंदी असतानाही लोकांनी दुधाच्या गाडीतून प्रवास करणे गंभीर आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं होतं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं.