मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 26 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी राज्यात महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले.
आज संध्याकाळी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. तसेच, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यानंतर आता महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील किराणा बाजार सोडून इतर मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोनाच्या नवीन 9 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 4 जण हे पुणे येथील पहिल्या 2 बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी 1 रुग्ण अहमदनगरला, 2 यवतमाळला तर 1 जण मुंबईतील रुग्णालयात भरती आहे.
या चौघांशिवाय मुंबईत आणखी 4 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबईहून आलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. तर, मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्सहून भारतात परतलेले आहेत. याशिवाय, नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेला आणि कतारहून देशात परतलेला 43 वर्षीय व्यक्ती सुद्धा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आज कोरोना बाधित आढळलेल्या 9 रुग्णांपैकी फक्त 1 जण महिला आहे. तसेच, राज्यात आज 131 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
चीनमधील कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.