मुंबई - कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशभरात हाहाकार घालायला सुरुवात केली आहे. देशातील काही बड्या शहरांमध्ये कर्फ्यूदेखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, गर्दी वाढली म्हणजे कोरोनाचं संकट संपलं असं समजू नका. कोरोनापासून एक-दोन नव्हे तर चार हात दूर रहा. धोक्याच्या वळणावर सावध राहा, अशी विनंती करत त्यांनी विरोधकांनवरही जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे म्हणाले, मला या विषयावर राजकारण करायचे नाही. पण, हे उघडा, ते उघडा, म्हणत आहेत. हो सर्व उघडतो! जबाबदारी घेताय?, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना केला. तसेच, या सरकारच्या माध्यमाने जनतेची जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असेही ते म्हणाले.
जनतेला आवाहन करत ठाकरे म्हणाले, कोरोनापासून स्वतःचा बचाव करा, कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका. पुन्हा लॉकडाऊन लावायचा नाही. रुग्ण संख्येत वाढ झाली आणि रुग्णालये कमी पडली तर कुणीही वाचवू शकणार नाही. कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्यासंदर्भात प्रश्नचिन्हच आहे. त्या उघडायच्या आहेत पण भीती आहे.कोरोनासंदर्भात केल्या जाणाऱ्या सूचनांसंदर्भात जनतेकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. "गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. आपले सर्वच सण गर्दीचे होते. मग त्यात गणपती असेल, दिवाळी आणि दसरा असेल. हे सर्व सण आपण अतिशय साधेपणाने साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. मी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण ऐकता, तुमच्या या सहकार्याला तोड नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचे सहकार्य मिळत राहो," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या शिवाय, मास्क न लावणाऱ्यांवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच नियमांचे काटेकोर पणे पालन करा अशी विनंतीही त्यांनी यावेळी जनतेला केली. याशिवाय ज्याप्रमाणे साधेपणाने आपण सण उत्सव साजरे केले अगदी त्याच प्रमाणे कार्तिकी यात्रेलाही कृपया गर्दी करू नका, उसे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १८ लाखांच्या जवळराज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत ५० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्याच्या घडीला ८१ हजार ५१२ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४६ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे.