मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे. 'कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
'रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपं आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तूर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली होती. मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी 31 मार्चपर्यंत असेल' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
'संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्याचं पोट हातावर आहे, त्याचं किमान वेतन कापू नका' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना आवाहन केलं आहे. तसेच सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय काहीही पर्याय नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी शुक्रवारी (20 मार्च) पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती दिली. 'राज्यातील जे कोरोनाग्रस्त आहेत त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना आणखी काही दिवस होम क्वारेंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, नागरिकांना घाबरून जाऊ नये. कोरोना झाल्यानंतरही रुग्ण बरे होतात. राज्यातील 1035 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 971 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागातील उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत करत आहे' असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
'राज्यात आणखी तीन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे, मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच 'मुंबईत येत असलेल्या प्रवाशांसाठी क्वारेंटाइन करण्यात येत आहे. बाहेरून आणण्यात येणाऱ्या नागरिकांची तेथेच तपासणी करण्यात येईल. निगेटिव्ह रिर्पोट आल्यानंतर त्यांना भारतात आणण्यात येईल. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी तूर्भेतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयातही क्वारेंटाइनची व्यवस्था करण्यात येईल. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अजूनही लोकलमध्ये गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्णय घेतले जाईल' अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Madhya Pradesh: अखेर कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार कोसळलं
Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने इस्राईलमध्ये भारतीयाला चिनी समजून मारहाण