पुणे : जगभरातील शंंभरहून अधिक देशांमध्ये काेराेनाचा फैलाव झाला आहे. जागतिक आराेग्य संघटनेने देखील काेराेनाला महामारी म्हणून घाेषित केले आहे. अमेरिकेत देखील या विषाणुचा प्रादुर्भाव माेठ्याप्रमाणावर झाला असून अनेक शहरांमध्ये टाळेबंद करण्यात आला आहे. याचाच फटका अमर फाेटाे स्टुडीओ नाटकाच्या प्रयाेगासाठी अमेरिकेत गेलेल्या कलाकारांना बसला आहे. या नाटकाचे अमेरिका दाैऱ्यातील उर्वरित सर्व प्रयाेग रद्द करण्यात करण्यात आले असून कलाकार भारतात येण्यास निघाले आहेत. जर्मनीपर्यंत त्यांचा प्रवास झाल्यानंतर आता भारतात येण्यासाठी त्यांना पुढील विमान मिळण्यास अडचणी येत आहेत.
अमर फाेटाे स्टुडीओ या नाटकाचा अमेरिका दाैरा काही महिन्यांपूर्वी ठरला हाेता. यात अमेरिकेतील विविध शहरांमध्ये या नाटकाचे प्रयाेग आयाेजित करण्यात आले हाेते. पाच मार्च राेजी या नाटकातील कलाकार अमेरिकेला गेले. काही प्रयाेग झाल्यानंतर काेराेनाचा माेठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव अमेरिकेत वाढल्याने उर्वरित प्रयाेग रद्द करण्यात आले. हे कलाकार अमेरिकेतील सॅन फ्रन्सिसकाे या शहरात अडकले हाेते. तेथून ते जर्मनीतील फ्रॅन्कफर्ट या शहरात आले असून तेथून भारतात येणारी अनेक विमाने रद्द झाल्याने ते तेथील विमानतळावर 12 तास अडकून पडले आहेत.
लाेकमतला माहिती देताना या नाटकातील अभिनेत्री पर्ण पेठे म्हणाली, काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे आमचा अमेरिका दाैरा अर्ध्यात रद्द करण्यात आला आहे. आम्ही मंगळवारी लवकर सॅन फ्रन्सिसकाे मधून निघालाे. आमची सॅन फ्रन्सिसकाे ते फ्रॅन्कफर्ट आणि तेथून मुंबई अशी फ्लाईट हाेती. परंतु फ्रॅन्कफर्टवरुन एअर इंडियाची सर्व विमाने रद्द केल्याने आम्हाला 12 तासानंतर एतिहात एअरलाईनच्या विमानाने अबुधाबी आणि तेथून मुंबईत येता येणार आहे.
या नाटकातील कलाकार सिध्देश पूरकर म्हणाला, आम्ही अमेरिकेतून जर्मनीतील फ्रॅन्कफर्ट या शहरात आलाे तेथून आमचे मुंबईसाठीचे विमान हाेते. परंतु ते रद्द झाले. त्यानंतर आमची एअर इंडियाचे विमान देखील रद्द झाले. आता आम्हाला अबुधाबीचे विमान मिळाले असून तेथून मुंबईला येता येणार आहे. परंतु अबुधावीवरुन मुंबईचे विमान रद्द झाल्यास आमच्या अडचणींमध्ये वाढ हाेण्याची शक्यता आहे.
दरम्यान सध्या अभिनेत्री पर्ण पेठे, पुजा ठाेंबरे, अभिनेता सिद्धेश पूरकर, तेजस देवधर तुशार कदम असे परतत असून अभिनेता अमेय वाघ आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी काही दिवसांनी भारतात परतणार आहेत.