मुंबई : राज्यात दिवसभरात ३५ हजार ७३६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून १६६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ७३ झाला आहे. तर, ३ लाख ३ हजार ४७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक १६६ दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, २३ मार्च रोजी १३१ मृत्यूंची नोंद झाली होती. मागील कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. मुंबईत दिवसभरात नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान झाले असून १२ जणांना जीव गमवावा लागला.
राज्यात शनिवारी १४ हजार ५२३ काेराेनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील काेराेनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८६.५८ टक्के इतके झाले असून मृत्यूचे प्रमाण २.२ टक्के आहे.
धक्कादायक! मुंबईत तासाला १४८ रुग्णगेल्या आठवडाभरात तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. मुंबई पालिकेने चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय घेत सरासरी २० ते २५ हजारपर्यंत होणाऱ्या चाचण्यांची संख्या ४७ हजारांच्या पुढे नेली आहे.