कोल्हापूर : कोरोनाचा जगभरात विखळा बसला असून दळणवळणालाही खीळ बसली आहे. अनेक देशांनी तर विमानोड्डाणेच बंद केली आहेत. यामुळे ऑफ्रिकेला गेलेले तरुण उद्योजक आणि भूखनिज क्षेत्रातील संशोधक असे दोघेजण गेल्या पाच-सहा दिवसांपासून मोरक्को विमानतळावरच अडकले आहेत. यामुळे त्यांचे कोल्हापुरातील कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहेत.
मोरक्कोमध्ये थंड वातावरण आहे. यामुळे पहिले तीन दिवस त्यांनी विमानतळाच्या बाहेरील भागामध्ये कसेबसे दिवस काढले. मात्र, नंतर त्यांनी विमानतळावरील एका खोलीमध्ये प्रवेश मिळवत संरक्षित केले आहे. हे दोघेही घरच्यांशी व्हिडीओ कॉलिंगवर संपर्कात आहेत. दोघांची प्रकृती उत्तम असून त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.
आदित्य पाटील हे उद्योजक आणि अनिल कुलकर्णी हे दोघे पश्चिम ऑफ्रिकेतील लायबेरियामध्ये गेले होते. खनिज उत्खननाची परवानगी मिळवत ते भारतात परतत होते. यासाठी त्यांनी १६ मार्चला विमानप्रवास सुरू केला. मोरक्कोला दुसरे विमान बदलायचे होते. पण कोरोनामुळे विमानतळावरील विमानोड्डाणेच प्रभावित झाली होती. यामुळे त्यांना तिथेच थांबावे लागले. सुरुवातीला त्यांनी विमानतळाच्या बाहेरील भागामध्ये तीन दिवस काढले. आज नाहीतर उद्या विमान मिळेल या एका आशेवरच ते राहत होते. मात्र, नंतर काहीच होत नसल्याचे पाहून त्यांनी भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. यामुळे त्यांना विमानतळावरील एका खोलीमध्ये राहण्याची परवानगी मिळाली.
त्यांच्यासोबत अन्य देशांचे असे तीसहून आधिक नागरिक विमानतळावरच राहत आहेत. यादरम्यान, आदित्य यांच्या मुलांनी कधी येणार असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी बाळा, लवकरच येईन, असे उत्तर दिले. मात्र, विमानोड्डाणे कधी सुरु होणार हे माहित नसल्याने ते वेळ सांगू शकले नाहीत.