VIDEO: पुण्यात अजित पवार कसे फेल गेले हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय; चंद्रकांत पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 10:22 PM2020-07-25T22:22:38+5:302020-07-25T22:32:19+5:30
CoronaVirus News: महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर पाटील यांची जोरदार टीका
पुणे: पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.पुण्यात अजित पवार कसे अपयशी ठरले आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातलं सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नसल्याचा त्यानं पुनरुच्चार केला.
पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली. त्यांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होता. 'पुण्यात अजित पवार कसे फेल ठरले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याबद्दल एकही बैठक घेतली नाही. त्यांना पुण्याची किती काळजी आहे? त्यांनी सगळं अजित पवारांवर सोडून दिलं आहे, अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सरकारनं पुणे महानगरपालिकेला काहीही दिलेलं नाही, असंदेखील पाटील म्हणाले.
पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. चाचण्यांची संख्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयूंची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली. फडणवीस प्रत्येक भागाचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहितात. मात्र त्याचं पुढे काहीच होत नाही. अजित पवार स्वत:च्या जिल्ह्यात फेल गेले, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र या राजकारणाचा फटका पुणेकरांना बसत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. उभं बजेट कापल्यावर अशोक चव्हाणांना राग येणारच ना, असा टोला पाटील यांनी लगावला. आम्ही सरकार पाडणार याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत कारण नसताना सरकार पाडण्याबद्दलची विधानं करत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं पाटील म्हणाले.