मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह संवाद साधला. सोशल डिस्टन्सिंग राखून गरजूंना मदत करा. लॉकडाऊनमुळे एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं. फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राज्यभरातल्या ३१ हजार शक्ती केंद्र प्रमुखांशी आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं. 'लॉकडाऊनमुळे कोणीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. प्रत्येकाला अन्न मिळेल याची काळजी घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डी यांनी तशी अपेक्षा व्यक्त केली आहे,' असं फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या काही महत्त्वाची निर्णयांची माहिती फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दिली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी पाहता पंतप्रधानांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. आयकर, जीएसटी भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ३१ मार्चला आयकर आणि जीएसटी भरावा लागणार नाही. याशिवाय बँकाचे हफ्ते भरण्यासही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय, खासगी, जिल्हा बँकांना कर्जवसुली करता येणार नाही. भविष्याचा विचार करुन व्याजदरदेखील कमी करण्यात आले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. लोकांच्या मदतीसाठी मेहनत घ्या. सोशल डिस्टन्सिंग पाळून गरजूंना सहकार्य करा. या काळात शेतकरी, मजूर, स्वच्छता कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी जास्त समन्वय राखण्याची आवश्यकता आहे', असं फडणवीस यांनी सांगितलं. पंतप्रधान सहाय्यता निधीत जास्तीत जास्त मदत करा. तुमची लहानशी मदतदेखील महत्त्वाची आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावून या कठीण काळात देशाला विजयी करण्यासठी प्रयत्न कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.