लातूर: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. लातूरचे भाजपा आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पवार यांनी ट्विटरवरून दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पवार यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं. ते फडणवीस यांचे अतिशय निकचवर्तीय म्हणून ओळखले जातात.अभिमन्यु पवार यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली. 'मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत' असं पवार यांनी सांगितलं आहे. 'लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही,' अशी माहिती त्यांनी दिली आहे. मागच्या ४-५ दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. दोन दिवसांत भाजपाच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काल दिवसभरात तीन भाजपाच्या आमदारांना कोरोनाची बाधा झाली. यातील दोन आमदार पुण्यातील आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला होता. याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली होती. यानंतर त्यांच्या घरातील ८ सदस्यांनाही कोरोना झाला होता. आता पुण्याच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना झाला आहे. टिळक यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. तर भाजपचेच पुणे जिल्ह्यातील दौडचे आमदार राहुल कुल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. यामुळे पुण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कोरोनाने विळखा घातला असून महापालिकेचे अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत. पुण्यानंतर उल्हासनगरमध्ये भाजपाचे तिसरे आमदार कोरोना बाधित झाले आहेत. कुमार आयलानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सत्ताधारी पक्षांतील दोन मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ते उपचारानंतर बरे झाले होते. आता विरोधी पक्षातल्या आमदारांना कोरोनाने गाठले आहे. एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील