मुंबई - वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ३६०० वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील ९९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी आणि देशातील सामुदायिक सामर्थ्य दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी नागरिकांना रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरात, बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेकजण याचा उत्सवच बनवू इच्छिताना दिसत आहे. माजी मंत्री आणि रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी तर मशाली पेटवणार असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात दिवे लावण्याच्या संकल्पनेवरुन वाद-विवाद आणि चर्चा सुरू झाली. अनेकांनी यास विरोध केला असून भाजपा नेते जोरदारपणे याचं समर्थन करत आहेत. ऊर्जीमंत्री नितीन राऊत यांनी अचानक लाईट गेल्यास पॉवर ग्रीडींचा धोका असल्याचं सांगितलंय. मात्र, केवळ मोदींनी सांगितलंय म्हणून हा विरोध होत असल्याचं प्रत्युत्तरादाखल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे सर्वांनीच दिवे लावावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे. तर, सदाभाऊ खोत यांनी तर आम्ही मशालीच पेटवणार असल्याचं म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आदेश आम्ही पाळणार असून संघटनेच्या कार्यकर्त्यांना मशाली पेटवण्याचे आवाहन खोत यांनी केलंय. तसेच, मशाली पेटवून आम्ही कोरोनाला हरवणार, असेही ते म्हणाले. त्यानुसार, रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आज रात्री आपापल्या घरी चक्क मशाली पेटवणार आहेत.