नवी दिल्ली - एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण देशात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता काहीसा कमी झाला असला तरी महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अद्याप कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. (Coronavirus in Maharashtra) या दोन्ही राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारची चिंता वाढत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढचे काही दिवस हे सणावारांचे असल्याने चिंता अधिकच वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून खबदारीचा इशारा दिला आहे. (Central Government writes letter to Maharashtra Government & advises to exercise curbs during Dahi Handi & Ganeshotsav)
या पत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, पुढील काही दिवसांमध्ये दही हंडी आणि गणेशोत्सव होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक पातळीवर गर्दी आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालावी. या सणांदरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्याचा विचार करावा, असा सल्लाही केंद्र सरकारने दिला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की दररोज समोर येत असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या एका महिन्यापासून कमी झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत जिथे संसर्गाच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत नियम लागू करण्यात आले आहेत.
त्यांनी सांगितले की, या आदेशाच्या माध्यमातून सल्ला देण्यात येतो की, महाराष्ट्रामध्ये येत्या सणांदरम्यान, सार्वजनिक कार्यक्रम तसेच लोकांच्याएकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्बंध लावावेत. दरम्यान, केंद्राने राज्य सरकारला टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेशन आणि कोविड अॅप्रोपिएट बिहेवियरवर भर देण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बीएमसीने मुंबईतील नागरिकांना कुठल्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांची त्वरित कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईमध्ये २६ ऑगस्ट रोजी कोरोनाचे ३९७ रुग्ण सापडले होते. ही २८ जुलैनंतर सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण होते.