मुंबई : राज्यातील मॉलमध्ये १८ वर्षांखालील मुलामुलींना प्रवेश देण्यासंबंधीची मार्गदर्शक सूचना शासनाने सोमवारी जारी केली. या मुलामुलींना वयाचा पुरावा मॉलच्या प्रवेशद्वारावर सादर केल्यानंतरच आत प्रवेश दिला जाईल.१८ वर्षांखालील मुलामुलींचे कोरोना लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. त्यांना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र सादर करावे लागेल.मॉल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास आधीच परवानगी दिली आहे. मॉल्समध्ये काम करणारे व प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक राहील. तसे प्रमाणपत्र व फोटोसह ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील, अशा मार्गदर्शक सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केल्या आहेत.
राज्यात ६२ हजार सक्रिय रुग्णराज्यात सोमवारी ५,८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६१,९५,७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के झाले आहे. सध्या ६२,४५२ रुग्ण उपचाराधीन आहेत.राज्यात दिवसभरात ४,१४५ रुग्णांचे निदान झाले असून, १०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.११ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२.५३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.