लोणावळा: जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पुर्णतः लाॅकडाऊन झाल्याचे चित्र पहायला मिळाले. हजारो वाहनांच्या वर्दळीने सतत गजबजलेला द्रुतगती मार्ग हा निमनुर्ष्य झाला होता. एकही वाहन द्रुतगती मार्गावरुन जाताना दिसत नव्हते.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याची विनंती देशाला केली होती. या आव्हानाला देशवासीयांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत गो कोरोनाचा संदेश दिला. कोरोनाच्या संकटचा संयमाने व धैर्याने मुकाबला करण्याचा संदेश मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे.
कोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसगणिक वाढ होत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्याकरिता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आव्हान महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा लग्न सोहळे ज्या ठिकाणी नागरिक एकत्र येतील असे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सर्व पर्यटन स्थळे हॉटेल रेस्टॉरंट शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे. याचा परिणाम मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे. आज जनता कर्फ्यूमूळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ओस पडला आहे. क्वचितच एखादे वाहन रस्त्यावर जात होते.
लोणावळा शहरात देखिल हीच परिस्थिती असून संपुर्ण बाजारपेठ व रस्त्यांवर सुकसुकाट आहे. कोणीही घराबाहेर न पडल्याने शहरात सर्वत्र निरंत शांतता पहायला मिळाली. रेल्वे स्थानक व बस स्थानक देखिल ओस पडली आहेत. रिक्षा, टॅक्सीचालक, हाॅटेल व चिक्की व्यावसायीक, लहानमोठे दुकानदार, पान टपरीधारक सर्वांनी जनता कर्फ्यूच्या आवाहानाला सकारात्मकता दाखवत व्यावहार बंद ठेवले आहेत.