मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी २१ दिवस देश लॉकडाऊन करत असल्याचं मोदींनी जाहीर केलं. हा अवधी संपण्यास आता जवळपास आठवडा उरला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत राज्यासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढवलं जाणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मोदींनी घोषणा करण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील लॉकडाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचक भाष्य केलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही, याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाईल. पुढील चार-पाच दिवसांत याबद्दलचा निर्णय होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दलची माहिती देतील. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य पावलं उचलली जातील. लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तशी मानसिकता ठेवावी आणि सहकार्य करावं, असं देशमुख म्हणाले.निझामुद्दीन मरकजवरुन परतलेल्या १३५० तबलिगींची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र अद्याप ५० जण नॉट रिचेबल असल्याचं त्यांनी सांगितलं. 'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले १४०० जण राज्यात आले. यातील साडे तेराशे तबलिगींशी संपर्क साधण्यात यश आलंय. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही ५० जण नॉट रिचेबल आहेत. त्यांनी फोन बंद केले आहेत. या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही त्यांच्या आवश्यक चाचण्या करू. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आमचं प्राधान्य आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं. लपून बसलेल्या ५० तबलिगींनी शासनाला सहकार्य करावं. अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात लॉकडाऊन असतानाही अनेक जण किराणा माल घेण्याच्या नावाखाली फिरत आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला जातो असं सांगून अनेक जण उगाच दुचाकी, चारचाकी घेऊन फिरत असल्याचं लक्षात आलं आहे. अशा व्यक्तींची वाहनं जप्त केली जातील आणि पोलिसांनी वाहनं जप्त केली की त्यांचं पुढे काय होतं, हे तुम्हाला माहितीच आहे, अशा शब्दांत देशमुख यांनी काम नसताना बाहेर भटकणाऱ्यांना इशारा दिला. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस सध्या अतिशय कठीण परिस्थितीत काम करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून ते झटत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असंदेखील ते म्हणाले.
CoronaVirus: १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार?; गृहमंत्र्यांचं सूचक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 1:30 PM