मुंबई – कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. १४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनं बंद आहेत. अशातच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोकांना गर्भीत इशारा दिला आहे.
राज्यातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे, परराज्यातील काही मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका, जिथे आहात तिथे राहा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतोय. काही रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे त्याठिकाणी कृपा करुन गर्दी करु नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.
सरकार लोकांची मदत करत आहे तुम्हीही सरकारला सहकार्य करा, कोरोनाशी लढण्यासाठी वेगळं खातं उघडलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेगळा विभाग केला आहे. उदय कोटक यांनी १० कोटींची निधी जाहीर केली. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मदत करतायेत. सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे. ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची दुर्दैवी अवस्था आहे. पण संकट भयंकर असताना जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान आहे. सर्व डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
तसेच डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना जबरदस्तीने सुट्टी दिली आहे. मात्र डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी सुट्टी न घेता दिवसरात्र काम करतायेत. कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.कोरोनाची लागण झालेल्यांपैकी अनेकांना उपचार देऊन बरं करण्यात आलं आहे ही दिलासादायक बाब आहे पण न्यूमोनियाची साथ वाढण्याची भीती आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी डोळ्यात तेल घालून काम करणं गरजेचे आहे. कोणतीही लक्षण आढळली तर तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, बाहेरुन आलेले जे लोक आहेत त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं पाहिजे, कुटुंबाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे, सध्याचा काळ बिकट आहे, याच काळात गुणाकाराने कोरोनाची संख्या वाढते, तेव्हाच आपल्याला वजाबाकी करायची आहे. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, २४ तास दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. तुम्ही घरात राहा, घराबाहेरची लढाई तुमचं सरकार पार पाडेल, पोलिसांशी हुज्जत घालू नये. घरात कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवा, काहीही मनोरंजनाचे खेळ खेळा पण बाहेर पडू नका. लॉकडाऊन होऊन ८ दिवस निघून गेले पुढचे काही दिवस असेच जातील या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होणार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला केले आहे.