मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी कोरोनाच्या नवीन 6 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे.
राज्यात सोमवारी सकाळी आढळलेल्या चार नवीन रुग्णांमध्ये तीन मुंबईतील आणि एक नवी मुंबईतील रुग्णाचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला. याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सध्या पिंपरी चिंचवडमध्ये - 9, पुणे- 7, मुंबई - 6, नागपूर - 4, यवतमाळ - 3, कल्याण - 3, नवी मुंबई - 3 आणि रायगड, ठाणे, अहमदनगर व औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी रोखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
याचबरोबर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व निवडणुकाही पुढील तीन महिने स्थगित करण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय-१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.२. ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवणार.३. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असा 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.४. क्वॉरेंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.५. ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहेत, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल.६. केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरेंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.७. आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खरेदी करण्याचा जिल्हा प्रशासनाला अधिकार.८. उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.९. नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.१०. होम क्वॉरेंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.११. धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.