मुंबई: कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे काँग्रेस पक्षही लोकांच्या मदतीसाठी सक्रिय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांना सर्व पातळ्यांवर लोकांना मदत करण्यासाठी पत्र पाठवून आवाहन केल्यानंतर आज त्यांनी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिका-यांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. गरीब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.थोरात म्हणाले, अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची काँग्रेसची परंपरा आहे. राज्याच्या. प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला मदत करण्यास काँग्रेस सेवादलातर्फे ५० प्रशिक्षित कार्यकर्ते तयार आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून १० हजार बाटल्या रक्त जमा करण्यात येत आहे. तसेच युवक काँग्रेस मार्फत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे गरजूंपर्यंत पोहोचवली पाहिजेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सोशल डिस्टन्शिंग आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत हे काम करावे. ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांच्या घरात अन्नधान्य शिल्लक नाही ज्यांना जेवणाची भ्रांत आहे अशा लोकांची संख्या मोठी आहे. आपल्या भागातील अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना घरपोच जेवण किंवा अन्नधान्य पोहोचविले पाहिजे. एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन थोरात यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आमदार कुणाल पाटील आमदार झिशान सिद्दिकी यांनी अत्यंत चांगले काम केल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, परिस्थिती गंभीर आहे अडचणींच्या काळात लोकांना मदत कशी करता येईल ते पहावे. जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून समन्वय ठेवावा. सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे. मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बांधकाम मजुरांना महामंडळामार्फत रो़ख रक्कम तात्काळ मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावेत. गरिब लोकांचे हाल होत आहेत त्यांना मदत पोहोचवली पाहिजे, विविध सामाजिक संस्थांशी समन्वय साधून प्रभावीपणे मदतकार्य करावे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचे हे संकट शतकातले सर्वात मोठे संकट आहे. विमानवाहतूक बंद करेपर्यंत १ जानेवारीपासून १२ लाखांपेक्षा जास्त प्रवासी परदेशातून आले आहेत. कोरोनाची लक्षणे १५ दिवस दिसत नसल्याने लोक क्वारंटाईन करून घेत नाहीत. आपल्या आसपास कोणी परदेशातून आलेले असल्याची माहीती असल्यास त्यांना डॉक्टरकडे नेऊन त्यांची तपासणी करावी. शहरातून शेकडोच्या संख्येने गावाकडे परत जाणाऱ्या मजुरांना त्रास सहन करावा लागतो आहे. मजूर वर्ग शहरांच्या बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करावी. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये फ्ल्यू ओपीडी सुरु करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार असून पुढचे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावेळी सर्वच नेत्यांनी सरकारच्या सूचना व सोशल डिस्टन्शिंग पाळून प्रशासनाशी समन्वय ठेवून गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.