CoronaVirus: “सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:14 PM2021-05-10T13:14:17+5:302021-05-10T13:16:05+5:30
CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाला टास्क फोर्स नेमावी लागत आहे. मग केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना केली असून, यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला टास्क फोर्स नेमावी लागत आहे. मग केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (coronavirus congress balasaheb thorat criticised centre govt over national task force)
गेल्या काही दिवसांपासून कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने वारंवार केंद्र सरकारला फटकारले आहे. राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची
मग मोदी सरकार काय करतंय?
केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमावी लागते. मग केंद्र सरकार करत आहे, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला न्यायालयाने सांगितले आहे. मात्र, केंद्र जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीकाही थोरात यांनी केला आहे.
तिसरी लाट थोपवली जाऊ शकते
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा शाश्वत उपाय आहे. त्यातून तिसरी लाट थोपवली जाऊ शकते. अनेक मृत्यू रोखले जाऊ शकतात. हजारो कुटुंबाचे मानसिक त्रास कमी केले जाऊ शकतात. पण केंद्र सरकार लस देत नाही. लस देण्यासाठी केंद्राकडे नियोजन नाही. केंद्र सरकार निष्क्रीय आहे, या शब्दांत थोरांताही निशाणा साधला आहे.
शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला.