मुंबई : अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने व रुग्णालयातील बाह्णरुग्ण विभाग बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही बाह्णरुग्ण अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत तसेच औषध दुकानेही उघडी असावीत, असे कळकळीचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.दरम्यान, काही ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक किरकोळ सर्दी खोकला असलेल्या रुग्णाला कोरोनासाठी तपासणी करण्यास सांगत आहेत. तसेच अशा रुग्णाला डॉक्टर तपासण्यास नकार देत असल्याबाबतच्या काही तुरळक तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे.प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे कोरोना नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारणे, योग्य माही. ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असल्यास आणि परदेश प्रवास किंवा बाधित रुग्णाच्या सहवासाचा इतिहास असेल तरच अशा रुग्णांची करोना तपासणी आवश्यक आहे. मागील काही दिवसात पुणे - मुंबई मधील लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत.काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भीतीचे वातावरण आहे, यालोकांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मागणी काही ठिकाणी होताना दिसते आहे. पुणे - मुंबई अथवा राज्यातील इतर भागातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे अपेक्षित नाही. कोरोनाच्या भितीने बहिष्कार टाकण्यात येऊ नये, असेही टोपे यांनी नमूद केले.
Coronavirus : दवाखाने, औषध दुकाने सुरू ठेवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 2:30 AM