मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आता हळूहळू सुधरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणार कालावधी आता २६ दिवसांवर पोहोचला आहे. मात्र राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण मात्र अद्याप कायम आहे. आज राज्यात कोरोनाचे ३ हजार ७५२ नवे रुग्ण सापडले असून, राज्यात आज दिवसभरात १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २० हजार ५०४ झाली असून, आतापर्यंत ५ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात सद्यस्थितीत कोरोनाचे ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ६० हजार ८३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
''राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.