मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार सावध झाले आहे. मात्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांकडून नियमांचे पालन होत नाही आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जाईल, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, विशेषकरून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने जी नियमावली तयार केली आहे, त्याचे लोकांकडून काटेकोरपणे पालन होत नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जर याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर निश्चितपणाने आपण लॉकडाऊनकडे जात आहोत काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल राज्यात तब्बल ३ हजार ९०० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईतही दिवसेंदिवस दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, सक्रिय रुग्णांचा आलेखही चढता आहे. शहर-उपनगरात बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २ हजार ५१० रुग्ण आढळून आले असून, मृतांचा आकडा एक आहे.