पुणे – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात पुढील २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवारी केली. जर या २१ दिवसांत कोरोनाचं संक्रमण रोखलं नाही तर मोठा अनर्थ होईल अशीही भीतीही त्यांनी व्यक्त केली. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही पण काळजी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये. स्वत:चं आणि कुटुंबाचे आरोग्य तुमच्याच हाती आहे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं.
देशात कोरोना व्हायरसचे ५३६ रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. राज्यातील हा आकडा १०० च्या पुढे गेला आहे. मात्र यातील २ जण वगळता इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पुण्यामध्ये कोरोनाचे पहिले दोन रुग्ण आढळून आले होते. हे दुबईहून पुण्यात आल्यानंतर काही दिवसांनी या त्रास जाणवू लागला. तेव्हा तपासणी केली असता या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये या दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं.
पुण्यातील या दोन्ही रुग्णांवर गेल्या २ आठवड्यापासून उपचार सुरु आहे. सध्या या दोघांची प्रकृती ठीक झाली असून त्यांची पुन्हा तपासणी केली असता कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. या दोन्ही रुग्णांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे.
दरम्यान, काही ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक किरकोळ सर्दी खोकला असलेल्या रुग्णाला कोरोनासाठी तपासणी करण्यास सांगत आहेत. तसेच अशा रुग्णाला डॉक्टर तपासण्यास नकार देत असल्याबाबतच्या काही तुरळक तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे कोरोना नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारणे, योग्य नाही. ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असल्यास आणि परदेश प्रवास किंवा बाधित रुग्णाच्या सहवास असेल तरच अशा रुग्णांची कोरोना तपासणी आवश्यक आहे असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडलं आहे.
कस्तुरबातील आठ जणांना घरी सोडले
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील आठ रुग्ण कोरोना विषाणुमुक्त झाले असून त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले़ लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच सुरक्षित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. घाटकोपर येथील झोपडपट्टीतील महिला कोरोना निगेटिव्ह झाली आहे, तिच्या ९ निकटवर्तीयांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे रोपोर्ट निगेटिव्ह आला.