- शिवराज बिचेवारनांदेड : कोरोनाच्या महामारीत इतर आजार असलेल्या रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे़ तामसा येथील अशाच एका ७३ वर्षीय रुग्णाला नांदेडात उपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने पाच रुग्णालयांनी त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला़ शेवटी जिल्हा रुग्णालयातच या वृद्धाने अखेरचा श्वास घेतला. परंतु मृत्यूनंतरही कोरोनाची तपासणी न करताच प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या धक्कादायक प्रकारामुळे वृद्धाचे कुटुंब हादरुन गेले आहे.चार दिवसापूर्वीच तामसा येथील किराणा व्यापारी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याच्या वडिलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नांदेडात आणले होते़ दुपारी ते हिंगोली गेट येथील रुग्णालयात गेले़ तेथे डॉक्टर नसल्याने डॉक्टर लेनला आले़ या ठिकाणी बाहेर उभ्या असलेल्या सेवकाने त्यांचा आॅक्सिजन स्तर तपासत खाटा शिल्लक नसल्याचे सांगितले.शिवाजीनगर भागातील आणखी तीन रुग्णालयांत ते गेले़ तेथूनही परत पाठविण्यात आले़ शेवटचा पर्याय म्हणून ते जिल्हा रुग्णालयात गेले़ घाबरलेल्या रूग्णाचा आॅक्सिजन स्तर आणखी खाली आला़ जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी विष्णूपुरी येथे जाण्याचा सल्ला दिला़ परंतु मुलाने विनंती केल्यानंतर त्यांनी रुग्णास कोविड सेंटरमध्ये दाखल केले़ तोच सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रुग्णाची प्राणज्योत मालवली.कोविड सेंटरमध्ये नेल्याने प्रशासनाकडूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भडाग्नी त्यांच्या मुलाने दिला.खरेच माणुसकी हरविली का?माझ्या वडिलांना मी उपचारासाठी नांदेडला आणले होते़ परंतु एकाही खाजगी रुग्णालयाने त्यांना श्वसनाचा आजार असल्याने दाखल करुन घेतले नाही़ जो-तो रुग्णालयात बेड नसल्याचे कारण पुढे करीत होता़ तब्बल पाच रुग्णालयांचे उंबरठे झिजविले़ शेवटी जिल्हा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला़ कोरोनाच्या या महामारीत माणसुकी हरविली आहे़ जिवाला काही किंमत राहिली नाही़ अशी प्रतिक्रिया मयताच्या मुलाने यांनी दिली़
coronavirus: कोरोनाची धास्ती, पाच रुग्णालयांनी उपचार नाकारलेल्या वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 12:59 AM