मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत विविध क्षेत्रामधून चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीने फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत भावूक ट्विट केले आहे.
रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणाले की, आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता. पण आज तुम्ही केलेल्या कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ट्विटमुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. पण मला माहिती आहे की, योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरे व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!
शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आज दुपारी आले. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं होतं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मला फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे शरद पवार म्हणाले.