मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णवाढीने अचानक उसळी घेतली असून, काल आटोपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, काही मंत्र्यांसह अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच काळजी करण्याचे कोणतेही कारण नसून संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,’मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या’, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, काल राज्यात तब्बल २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत मंगळवारी १ हजार ३७७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहर उपनगरात ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. सोमवारी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ९६७ दिवसांवर होता. मंगळवारी हे प्रमाण ८४१ दिवसांवर आले आहे, तर २१ ते २७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.९ टक्के झाला आहे. सोमवारी हा दर ०.७ टक्के इतका होता.