बुलडाणा : सौदी अरेबिया येथून परतल्यानंतर कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या ७१ वर्षीय वृद्ध इसमाचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संशयिताचा मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या रुग्णाचे तपासणी अहवाल अद्याप आले नसल्याने सध्यातरी तो कोरोना संशयितच असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून हा ७१ वर्षीय रुग्ण आजारी होता. त्यास मधुमेह व ह्रदयरोग व श्वसनाचा आजार होता. दरम्यान गेल्या काही दिवसापासून त्यांनी मधुमेहाची औषधेही घेतलेली नव्हती, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. सोबतच हा रुग्ण कोरोना संशयीत रुग्ण होता, असे त्यांनी सांगितले. त्यास प्रारंभी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सर्दी आणि खोकल्याचा त्रास त्यास होत असल्याने आणि परदेशातून आल्यामुळे त्यास खासगी रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. हा वृद्ध व्यक्ती चिखली तालुक्यातील असून त्याच्यामध्ये ताप व खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेमध्ये शनिवारी दुपारीच तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १५ मार्चला सायंकाळी किंवा १६ मार्च रोजी दुपारपर्यंत अनुषंगीक अहवाल हा जिल्हा सामान्य रुग्णालयास इ-मेलद्वारे प्राप्त होण्याची शक्यता रुग्णालयीन सुत्रांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष अहवाल आल्यानंतर त्याबाबत स्पष्टपणे सांगता येईल, असे डॉ. पंडीत यांनी सांगितले.या मृत व्यक्तीचे शवविच्छेदनही हे कोरोनाशी संबंधीत सेफ्टी किट वापरूनच करण्यात येत आहे. सोबतच या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनाचेही होम क्वांरंटीन करण्यात येत असून चिखली तालुका आरोग्य अधिकाºयांच्या नेतृत्तवातील एक पथक अनुषंगीक स्क्रीनींग करत असल्याचेही डॉ. पंडीत म्हणाले. संबंधीत व्यक्ती हा हज यात्रेसाठी गेला होतो. तेथून परत येत असतानाच ते आजारी पडले होते. सोबतच गेल्या काही दिवसापासून ते बोलतही नव्हते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीही यासंदर्भातील रिपोर्ट येण्याची वाट बघावी. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा तथा अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट केले.
मृत पावलेला व्यक्ती हा कोरोना संशयीत रुग्ण होता. त्यांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नाही. तो आल्यानंतर स्पष्टता येईल. दरम्यान, त्याच्या संपर्कात असलेल्यांचेही आरोग्य यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्क्रीनींग करत आहे.- डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा