मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. तर मुंबईतही सोमवारी १८७ रुग्णांचे निदान झाले. मुंबईची संख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत बळींचा आकडा १३९ झाला. पुण्यात ५९ नव्या रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ७५६ वर पोहोचली आहे.सोमवारी राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी सहा पुरुष तर तीन महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत. तर एक रुग्ण ४० ते ६० वयोगटातील व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखींपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. उर्वरित सात जणांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार होते.७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सोमवारी ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यातील ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.राज्यातील २ हजार ३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १ हजार ८९० म्हणजेच ८१ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर १७ टक्के म्हणजे ३९३ रुग्णांना लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण म्हणजेच दोन टक्के हे आयसीयूमध्ये आहेत.पाहणीसाठी येणार केंद्राचे पथक : मुंबई-पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने दहा सदस्यांचे पथक महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
CoronaVirus: राज्यात कोरोनाचा वाढला प्रकोप; एकट्या मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:13 AM