यवतमाळ - कोरोना संकटाच्या काळात वर्तमानपत्र विश्वासार्ह माध्यम असल्याची ग्वाही अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेली आहे. असे असताना वृत्तपत्र वितरणावर बंदीचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याविषयी फेरविचार केला जावा, असे मत माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले आहे. स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीसाठी होणारी गर्दी धोकादायक ठरेल, अशीही चिंता अॅड.मोघे यांनी व्यक्त केली आहे.वृत्तपत्र घरोघरी पोहोचले नाही तर, नागरिकांना सविस्तर आणि आपल्या गावातील, परिसरातील माहिती उपलब्ध होणार नाही. बातम्याच नव्हे तर इतरही माहिती वृत्तपत्रात असते. ही माहिती जाणून घेण्यापासून वाचक मुकतील. वृत्तपत्राची छपाई करायची, पण वितरणावर बंदी हे कुठले धोरण, असा प्रश्न अॅड.मोघे यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसापर्यंत वृत्तपत्र पोहोचते. अलीकडे उलटसुलट बातम्यांना पेव फुटले आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडतात. वस्तुनिष्ठ बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र करीत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या लोकांना विविध घटकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. शासनाला मदतनिधी देण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्याने मदत करणारे अनेक हात पुढे येत आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून मदत निधी दिला जात आहे. तेरवीचा खर्च टाळून गरजूंना अन्नदान केले जात आहे. लोकजागृतीचे काम वृत्तपत्र करीत आहे. यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. शासनाला या माध्यमातून मोठा हातभार लागत आहे. त्यामुळे वृत्तपत्र वितरणावरील बंदीबाबत फेरविचार करावा, असे अॅड.शिवाजीराव मोघे यांनी म्हटले आहे.
coronavirus : वृत्तपत्र वितरणबंदीच्या निर्णयावर फेरविचार व्हावा - शिवाजीराव मोघे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 5:55 PM