मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहे, आयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच राज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे राज्यात कोरोना वाढतोय ते पाहिल्यास देशातील ४१ टक्के अॅक्टिव्ह पेशंट महाराष्ट्रात होत आहेत. तसेच देशात होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंपैकी ४१ टक्के महाराष्ट्रात झाले आहे. ही संख्या रोज वाढतेय. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून आकड्यांची हेरफेर सुरू आहे. काल एका दिवसांत ८ हजार जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. खरोखर रुग्ण होत असतील तर आनंदच आहेत. मात्र केवळ नंबर गेमसाठी आकड्यांचा असा खेळ करण्यापेक्षा मुंबईत लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर लोक मरत आहेत. यासंदर्भात सरकारकडून काही उपाययोजना केल्या पाहिजे होत्या.’’
तसेच आयसीएमआरकडून दिलेल्या सूचनांचे पालनही राज्य सरकारने योग्य प्रकारे केले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होणार असे आयसीएमआरकडून त्यानंतर केंद्रीय पथकाने सांगितले होते. मात्र त्याबाबत राज्य सरकारने काय व्यवस्था केली होती. आता राज्य सरकार बेड्सची व्यवस्था केल्याचे सांगतेय मात्र हे सर्व बेड्स मिळून चार हजार आहेत. तर रुग्णांची संख्या दररोज दीड हजारने वाढत आहे. तसेच इथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.
अशा परिस्थितीत राजकारण करणे योग्य ठरणार नाही. त्याची ही वेळदेखील नाही. त्यामुळे अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यापेक्षा सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल, बनवाबनवी करत असेल तर आम्हाला सरकारला, आरसा दाखवावा लागेल. तसेच आपल्याला कोरोनाची लढाई लढायची आहे त्यासाठी तुम्ही योग्य कारवाई, करा असे सांगावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले की, आयसीएमआरच्या निर्देशांचे म्हणावे तसे पालन आपल्या राज्यात झाले नाही. परवा राज्यातल्या एका मंत्र्याने आपण जगातील सर्वात जास्त टेस्ट केल्याचे सांगितले. मात्र महाराष्ट्रापेक्षा राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूने अधिक टेस्ट केल्या. तसेच आपल्या आजूबाजूच्या राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्ये मागे २५१३ चाचण्या केल्या आहेत. तर गुरजातने २४६४ आणि कर्नाटकने २४६७ चाचण्या केल्या आहेत. मात्र या राज्यांपेक्षा आपल्याकडे कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. मुंबईत १० हजार टेस्टची क्षमता असताना कमी टेस्ट केल्या जात आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी
सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा आमचा विचार नाही. पण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी सरकारने केल्या नाहीत. तर कुणीतर विचारलंच पाहिजे. ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली पाहिजे. उद्या समजा आकडे अचानक वाढले. तर आपल्याल पळता येईल का, म्हणूनच आपण प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असेही फडणवीस पुढे म्हणाले.