मुंबई: गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर आला आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्याची ओढ लागली आहे. मात्र कोरोनाचं संकट पाहता यंदा गावी जायला मिळेल का, असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येईल. मात्र त्यांना नियमांचं पालन करावं लागेल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.चाकरमान्यांना नियम आणि अटींचं पालन करून गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. 'कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुंबई, एमएमआर भागातून, पुण्यातून आणि बाकी ठिकाणाहून चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातात. त्यांच्या प्रकृतीची काळजी विचारात घेऊन आम्ही आयसीएमआर आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत,' असं परब यांनी सांगितलं.अनिल परब यांनी दिलेल्या माहितीमुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची परवानगी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र यासाठी काही नियम आणि अटी घातल्या जाणार आहेत. त्या नेमक्या काय असणार, हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. सध्या प्रवास करताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळावं लागतं. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जातात. त्यामुळे प्रवासादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनासमोर असेल.
CoronaVirus News: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 5:25 PM