जळगावात पंधरा दिवसांपूर्वी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या कोरोनाबाधित रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे 14 दिवसानंतर व 15 दिवसानंतर दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल 17 दिवसानंतर या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.
जळगावमध्ये कोरोनबाधित दोन रुग्ण आढळले होते. एकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. तर आता दूसरा कोरोनाबाधित रुग्णांने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आता जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे देखील जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले की, पहिला संशयित हा 28 मार्चपासून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत होता. दोन दिवसांपूर्वी या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा पहिला अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला होता. त्याचा दुसरा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाला. अहवाल "निगेटिव्ह' आला. त्यामुळे हा रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला बुधवारी संध्याकाळी घरी सोडण्यात आले. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.
डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी हे देवदूत ठरल्यानेच पुर्नजन्म झाला
कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतेल, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार झाले, अगदी कुटुंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी 17 दिवसात बरा झालो. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी हे सर्व माझ्यासाठी देवदूत ठरले. त्यांच्यामुळेच मला पुर्नजन्म मिळाला असून मी खूप आनंदी आहे. माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित रुग्णाने महाविद्यालयाच्या कोरोना संसर्ग वॉर्डातून घरी जाताना व्यक्त केली.