कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वीच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हा धोक्याचा इशारा आहे. सतर्क राहा, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा, असे निर्देश मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासनाला शुक्रवारी दिले.
उद्योगविश्व थांबू देऊ नका. मोठ्या कंपन्यांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारातच करावी. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी कारखान्याजवळ स्वतंत्र निवासव्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ती अजूनही साडेआठ ते ९ हजारांवर स्थिरावली आहे. अजूनही ती त्याखाली जाताना दिसत नाही. उलट काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना आरटीपीसीआर चाचण्या वाढवा, सार्वजनिक ठिकाणी, तसेच पर्यटनस्थळी गर्दी होऊ देऊ नका, रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील, याची दक्षता घ्या. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेन्मेंट झोन जाहीर करून त्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा. ऑक्सिजननिर्मितीला वेग द्या. आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडू देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
खासगी रुग्णालयांच्या कोट्यातून उद्योजकांनी त्यांच्या कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. प्रदीप व्यास यांनी कोरोना स्थितीचे सादरीकरण केले.
या जिल्ह्यांमध्ये चिंता कायमपुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि अहमदनगर या आठ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाबत अधिक चिंतेची स्थिती आहे. या ठिकाणी काही गावांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढली तर रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाळी पर्यटनानिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. स्थानिक प्रशासनाने ती रोखावी. कठोर नियम करावेत असे मुख्यमंत्री म्हणाले.