मुंबई – मागील २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीमुळे लोकं दहशतीच्या सावटाखाली जगत होती. लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे लोकांचे जगणं कठीण झाले. या महामारीमुळे लाखो लोकांचा जीव गेला. परंतु लसीकरणामुळे सर्व देशात नवी आशा निर्माण झाली. हळूहळू कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली. भारतातही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे २ वर्षापासून लावलेले निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही येत्या गुढी पाडव्यापासून म्हणजे २ एप्रिलपासून राज्यात लावलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता मास्क घालण्याचीही सक्ती नाही असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यावर कोरोना विश्लेषक डॉक्टर रवी गोडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. रवी गोडसे(Dr Ravi Godse) म्हणतात की, चिऊ ताई, चिऊ ताईनं दार उघड, शेवटी एकदाच दार उघडलं. उशीरा का होईना दार उघडलं आहे. शाब्बास, लसीकरणाच्या कामाला चांगलं सहकार्य केले. आता चिऊताईंच्या वेगवेगळ्या समित्या आणि कमिट्या आहेत त्यांना चिमुकली विनंती आहे. आपली चिमणी बुद्धीपणाला लावून दुसरी काही लफडी करू नका. दार उघडलंय ते सतत कायम ठेवा. उडून उडून जावा. दाणे टिपायला नवीन अंगण घ्यावं अशी मार्मिक टीप्पणी रवी गोडसेंनी केली आहे.
अलीकडेच डॉ. रवी गोडसेंनी भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही असं विधान केले होते. ते म्हणाले होते की, भारतातील कम्युनिटी ट्रान्समिशनचं प्रमाण पाहता भारतात आता मास्क वापरण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, असं माझं वैद्यकीय वैयक्तिक मत आहे. हे मी हजारो रुग्णांवर केलेले उपचार आणि अनुभवातून सांगत आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांनी आता मास्कची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. इटलीने टास्क फोर्सला सुट्टी दिली आहे. आता कोरोनासोबतच राहायचं आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे. ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जाव्या लागलेल्या आणि तिथे ऑक्सिजनची गरज भासलेल्या किती लोकांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता, याचा आढावा घेतला तर प्रत्येक माणसाला स्वत:चं उत्तर मिळेल असं त्यांनी सांगितले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं लोकांना आवाहन
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) केले आहे.