मुंबई: कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट कमी असल्याच्या काही तक्रारी येत होत्या. मात्र सर्व वैद्यकीय साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं टोपे यांनी आकडेवारीसह सांगितलं. मुंबईत ९० कन्टेन्मेंट झोन सुरू करण्यात आले असून त्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवल्या जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. सध्या राज्यात अडीच लाख एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. याशिवाय २५ हजार पीपीई किट्स, २५ लाख ट्रिपल लेअर मास्क, दीड हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. काही खासगी रुग्णालयांकडेही व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास त्यांचा वापर केला जाईल, असं टोपेंनी सांगितलं.एन-९५ मास्क, पीपीई किट्सचं प्रमाण अपुरं असल्याच्या तक्रारींवरदेखील आरोग्यमंत्र्यांनी भाष्य केलं. सर्व डॉक्टरांनी एन-९५ मास्क, पीपीई किट्स वापरणं गरजेचं नाही. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी तसा आग्रह धरू नये. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एन-९५ मास्क, पीपीई किट्स वापरणं गरजेचं आहे. तशी मार्गदर्शक तत्वंदेखील आहेत. सगळ्याच डॉक्टरांनी एन-९५ मास्क आणि पीपीई किट्सची मागणी केल्यास त्यांचा तुटवडा जाणवेल, असंदेखील ते पुढे म्हणाले.कोरोनाची बाधा झाल्यावर रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्यावर भर द्यावा, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं. व्हिटामीन सी असलेल्या फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला. लोकांनी मोसंबी, संत्री, आवळा अशी फळं खावीत. गरम पाणी प्यावं. हळद, जिरं, लसूण, धणे यांचा जेवणात समावेश करावा, असं टोपे म्हणाले.
CoronaVirus: कोरोनाला कसं रोखता येईल?; आरोग्य मंत्र्यांचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 5:51 PM