मुंबई - कोरोना लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे. तुम्ही केवळ एकच मदत करा, घरी बसा, असं आवाहन ठाकरे यांनी केलंय. तसेच, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीमध्ये कोणाही अडथळा आणू नका, अनावश्यक प्रवास टाळा. पोलिसांना मी सांगतोय, आपण जगणं बदललं नाही, केवळ जगण्याची शैली बदललीय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी पोलिसांनाही सबुरीने घ्या, असा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या संबोधनानंतर काही वेळातच पंतप्रधाननरेंद्र मोदींना देशवासियांना संबोधित केले. त्यामध्ये आज मध्यरात्रीपासून देशात २१ दिवसांचं लॉक डाऊन करण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. मोदींच्या या आवाहनानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलणं झाल्याचे सांगितले.
"माझे पंतप्रधान @NarendraModi जी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये. "मात्र हे संकट गंभीर आहे. कृपया घराबाहेर पडू नये, महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे.", असे ट्विट करुन आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. मोदींच्या लॉकडाऊन आवाहनानंतर नागरिकांमध्ये गंभीर वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी किराणा आणि अत्यावश्यक सेवांच्या दुकानी खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलंय.
दरम्यान, आपण जीवनावश्यक वस्तूंसाठी मालवाहतूक थांबवली नाही, तसेच शेतकरी आणि कृषीविषयक मालवाहतूक, अन्नधान्य वाहतूक आपण थांबवली नाही. त्यामुळे शेतीसंबंधित नागरिकांना सहकार्य करा, असे आवाहन ठाकरे यांनी पोलिसांना केले आहे. तसेच, जीवनावश्य वस्तूंची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या गाडीवर नाव टाकावेत व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे, असेही ठाकरे यांनी म्हटलंय.