पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेले किंवा संशयितांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्याची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थे (एनआयव्ही)सह देशातील ५० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये होत आहे. या तपासणीची प्रक्रिया, त्याचा खर्च, कालावधी यांसह अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. तसेच अन्य देशांमध्ये नागरिकांच्या नमुन्यांची मोठ्या प्रमाणावर तपासणी होत आहे. भारतातही ही तपासणी करण्याची मागणी होते. या अनुषंगाने ‘एनआयव्ही’तील वरिष्ठ शास्त्रज्ञ बाबासाहेब तांदळे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
* प्रश्न : विषाणू म्हणजे काय? शरीरात प्रवेश केल्यानंतर वाढ कशी होते? - उत्तर : विषाणू हा एच प्रथिनांचा समूह असल्यामुळे शरीराबाहेर जिवंत राहू शकत नाही. त्यासाठी मानवी पेशींची गरज लागते. कोणताही विषाणू शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करून पेशींच्या कार्यात बाधा आणतो. त्यामुळे पेशींचे मुळ काम बंद होत जाऊन त्या नष्ट होत जातात.* प्रश्न : जास्तीत जास्त लोकांच्या नमुन्यांची कोरोना तपासणी (टेस्ट) का केली जात नाही?- उत्तर : सध्या भारत दुसऱ्या स्तराच्या संक्रमणात आहे. त्यामुळे टेस्ट करण्यासाठी फक्त परदेशातून आलेले प्रवासी किंवा कोविड रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींमध्येच मर्यादित आहे. सध्याची टेस्टींग प्रक्रिया यासाठी उपयुक्त आहे. समाजामधील संक्रमणाबाबत आता सांगणे शक्य नाही.* प्रश्न : रॅन्डम टेस्टिंगमध्ये कोणता धोका आहे?- उत्तर : रॅन्डम टेस्टिंग करण्याचा मूळ उद्देश सामान्य जनतेमध्ये संक्रमण आहे किंवा नाही याची तपासणी करणे हा आहे. त्यामुळे ही तपासणी कमी प्रमाणात आहे. आतापर्यंत देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये केलेल्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्याचे संक्रमण केवळ परदेशातून आलेले प्रवासी व त्यांच्या संपर्कातील लोकांमध्ये आढळून आले आहे. *प्रश्न : समाजामध्ये व्यक्ती ते व्यक्ती (कम्युनिटी इन्फेक्शन) या स्तरावर पुण्यातील संक्रमण गेले आहे का?- उत्तर : नाही. पुण्यात अजूनही फक्त परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींमध्येच होत आहे. * प्रश्न : टेस्टिंग किट काय असते. हे किट कुठे तयार होते? उत्तर : टेस्टिंग किट ही पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (पीसीआर) पद्धतीची आहे. यामध्ये विषाणूचे ‘आरएनए’ रिप्लिकेट केला जातो. डीएनए व आरएनए मिळाला की तो वृद्धिंगत केला जातो. त्यावरून तो कुठल्या प्रकारचा आहे, हे कळते. त्यासाठी लागणारे रिएजंट्स भारतात उपलब्ध आहेत. परंतु प्रायमर व प्रोब्ससाठी जागतिक आरोग्य संघटना व आंतरराष्ट्रीय साहाय्य घेतले जात आहे. प्रायमर व प्रोब्स ही रसायने आहे. रुग्णाच्या नमुन्यामध्ये विषाणूचे अस्तित्व आहे की नाही, हे शोधण्यासाठी प्रोब्सचा वापर होतो. तर प्रायमर त्यासाठी साहाय्य करते. * प्रश्न : कोरोना निश्चितीसाठी एका नमुन्याची किती वेळा तपासणी करावी लागते?- उत्तर : एका नमुन्याची एकदा तपासणी केली जाते. गरज असल्यास त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुन्हा तपासणी केली जाते.* प्रश्न : एका तपासणीला किती वेळ लागतो?- उत्तर : एक नमुना तपासण्यासाठी ४ ते ६ तासांचा कालावधी लागतो. त्यामध्ये एकदाच तपासणी होते. आणखी तपासणीसाठी अधिकचा २ ते ४ तासांचा कालावधी वाढू शकतो.* प्रश्न : एका तपासणीसाठी किती खर्च येतो?- उत्तर : प्रत्येक नमुन्याची एकदा तपासणी करण्यासाठी १५०० रुपये खर्च येतो. ती तपासणी पुन्हा किंवा अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी केल्यास ३ हजार खर्च होतो. त्यामुळे एका तपासणीसाठी जवळपास ५ हजार रुपये खर्च होतात.* प्रश्न : नमुने तपासणीची प्रक्रिया कशी होते? उत्तर : कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचा स्वॅब (घशातील द्रव) घेऊन जवळच्या प्रयोगशाळेकडे ‘आयडीएसपी’ अधिकाऱ्यांकडून संदर्भित केला जातो. स्वॅब प्रयोगशाळेत आल्यानंतर त्याची प्रथम प्रक्रिया करून ‘आरएनए’ विलग केला जातो. त्यानंतर त्याचा पीसीआर प्रक्रियेसाठी वापर होतो. वृद्धिंगत केलेला ‘आरएनए’ कुठला आहे, याची तपासणी होते. त्यानंतर अधिक तपासणी करून ‘सिक्वेन्स मॅच’ करून अहवाल केला जातो.