मुंबई : वारंवार सूचना करूनही लोकांनी घराबाहेर पडणे कमी न केल्याने अखेर नाईलाजास्तव महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर साधे चिटपाखरूही दिसत नाहीय. बाहेर कोणी फिरताना दिसलाच तर पोलिस त्यांना प्रसाद देत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
यामुळे शरद पवार यांनी थेट केंद्रीय अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना विनंती केली आहे. कोरोनाव्हायरसमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन झाले आहे. यामुळे नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि आसपासच्या भागातील धान खरेदीची मुदत ४ ते ६ आठवड्यांनी वाढवावी अशी मागणी केली आहे.
कोरोनामुळे राज्यातील प्रमुख शहरांमधील एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे शहरांसह गावांमध्येही भाज्या उपलब्ध होत नाहीत. लोकांनी धास्तीने किराना मालाची दुकानेही बंद ठेवली आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना त्यांना पुरेशा प्रमाणात भाजीपाला, दूध मिळेल, काळजी करून गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. कारण गर्दी केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.