कोल्हापूर: शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. संचारबंदी असताना सांगलीतून विनापरवाना कोल्हापुरातल्या उदगावमध्ये आल्यानं भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोनत महिनांपूर्वी संभाजी भिडे यांनी कोरोनावरील उपचारांत गोमूत्र आणि गायीचं तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा केला होता. गोमूत्र, गायीचं तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना केंद्र आणि राज्य शासनानं गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असं त्यांनी सुचवलं. कोरोनाबाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्यानं नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं मी आयुर्वेदात वाचलंय. या जंतूंचा नाश करण्याचं सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचं बोट लावावं. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावं, असे उपाय त्यांनी सुचवले होते.केंद्र आणि राज्य सरकार भगवंतानं दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास हे संशोधन आपण पुढल्या पिढ्यांना देऊ शकू. त्याचा त्यांना उपयोग होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.
CoronaVirus News: संचारबंदीचं उल्लंघन केल्यानं संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 9:00 PM