मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 11267 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा 52 वर पोहचला आहे. त्यामुळे अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जनतेने सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न होत आहेत. तर आपणही जिल्हा व ग्रामीण पातळीपर्यंत असे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे नागरिकांनीही स्वयंशिस्त बाळगावी आणि घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
राज्यात पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक तर मुंबई येथे दोन, असे चार नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या 52 झाली आहे. रुग्णालयातील कोरोनाच्या 41 जणांची प्रकृती उत्तम असून, 8 जणांना सौम्य लक्षणे आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील दोघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.