संपूर्ण जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचे देशात 148 रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 43 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन सरकार वारंवार करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात संशयितांच्या हातावर निळ्या रंगाचे शिक्के मारायला सुरुवात केली आहे. तसेच हातावर विलगीकरण (क्वारंटाईन) केल्याचे शिक्के असणाऱ्यांना रेल्वेचा प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तरीही 4 रुग्ण रेल्वेने प्रवास करत असल्याची घटना समोर आली आहे.
हातावर विलगीकरणाचे शिक्के मारलेले चारही कोरोना संशयित रुग्ण जर्मनीहून मुंबईला आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून त्यांना गुजरातमधील सूरतपर्यत प्रवास करायचा होता. मात्र रेल्वेमधील प्रवाशांना त्या चारही रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के टीटी आणि सहप्रवशांना दिसले. यानंतर टीटी आणि प्रवाशांनी पालघर स्थानकाजवळच रेल्वे थांबवली. तसेच प्रवाशांनी आरोग्य पथकाकला यासंबधित माहिती देऊन त्यांना रेल्वेमधून उतरवण्याची विनंती केली. तसेच पालघरच्या आरोग्य पथकाकडून संशयित रुग्णांची तपासणी सुरु आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावी खाजगी वाहनातून रवानगी करण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
राज्य सरकारने कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या देशांमधून आलेल्या लोकांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. A म्हणजे ज्यांच्यात लक्षण आहेत, त्यांना वेगळे ठेवले जाणार आहे. B मध्ये वयोवृद्ध आहेत, ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शनचा त्रास आहे. त्यांनाही 14 दिवस क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. 14 दिवस लक्षणे आढळली नाहीत तर ट्रीटमेंट होणार नाही. तर C मध्ये परदेशातून आले, मात्र ज्यांना लक्षण नाही अशांना घरातच क्वॉरेंटाईन करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 28 वर्षीय महिला फ्रान्स व नेदरलँड या देशांत प्रवास करून पुण्यात आली आहे. त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची तपासणी अहवालातून समोर आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18वर पोहोचली असून, राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 43 झाला आहे.
राज्यात मंगळवारी नव्या 105 संशयित रुग्णांना भरती करण्यात आलं आहे. आतापर्यंत बाधित भागातून एकूण 1,169 प्रवासी राज्यात आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 900 जणांना भरती करण्यात आले आहे. यापैकी 779 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत.