नवी मुंबई - राज्यातील कोरोनाचे संकट अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना मृतांचा आकडाही हळुहळू वाढू लागला आहे. वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा 124 वर पोहोचला आहे.
देशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आले. तर महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 112 रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात एकूण कोरोनाबधितांची संख्या 600 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कालपासून 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे.